

सांगली ः कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शाळा, महाविद्यालये, शिकवण्या, ग्रंथालय बंद करण्यात आले आहेत. त्याचा थेट फटका स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या काही हजार विद्यार्थ्यांना बसला आहे.
अगदी तोंडावर परीक्षा आलेली असता, प्रत्येक दिवस महत्वाचा असताना या विद्यार्थ्यांचे अभ्यासाचे सगळे मार्ग "टाळेबंदी'त अडकले आहेत. त्यामुळे एप्रिल आणि मे महिन्यात होणाऱ्या एमपीएसीच्या सर्वच परीक्षांच्या तयारीवर मोठा परिणाम होणार असल्याचे विद्यार्थी आणि मार्गदर्शकांनी "सकाळ'शी बोलताना सांगितले.
स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी जिल्हाभरातून मुले-मुली सांगलीत येतात. येथे हॉस्टेलमध्ये राहतात. गरिबीशी झगडत अभ्यास करतात. त्यांच्यासाठी कोरोना वेगळेच संकट बनून आला आहे. टाळेबंदीचा मोठा फटका त्यांना बसणार आहे. एक तर त्यांना गावी जावे लागणार आहे आणि दुसरे म्हणजे अभ्यासाचे सगळे स्त्रोत आटणार आहेत. त्यामुळे करायचे काय, या विवंचनेत अनेकजण आहेत. सांगलीत स्थायिक असणाऱ्यांवरही हे संकट आहे. कारण, शिकवण्या होणार नाहीत, शिवाय ग्रंथालये आणि अभ्यासिका बंद राहणार असल्याचे शांत वातावरणात अभ्यास करता येणार नाही.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे पुढील महिन्यात महत्वाच्या पूर्व परीक्षा आहेत. 31 मार्चपर्यंतच्या परीक्षा लांबणीवर टाकल्या आहेत, पुढेही वेळापत्रकात काही बदल होऊ शकतो, मात्र परीक्षा तोंडावर आहेत. राज्य सेवा परीक्षेसह अभियांत्रिकी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा, दुय्यम सेवा संयुक्त पूर्व परीक्षा, कृषी सेवा परीक्षेची तयारी करणारे अडचणीत आहेत. आयोगाने डिसेंबर 2019 मध्ये जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार राज्यसेवा परीक्षेतील पूर्वपरीक्षा 5 एप्रिलला आहे. महाराष्ट्र वन सेवा पूर्व परीक्षा 10 मे रोजी, महाराष्ट्र कृषी सेवा परीक्षा 5 जुलै रोजी, पोलीस उपनिरीक्षक, राज्य कर निरीक्षक, सहायक कक्ष अधिकारी पदासाठी पूर्व परीक्षा 3 मे रोजी होणार आहे. महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 17 मे रोजी आहे. गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 7 जून रोजी आहे. मुख्य परीक्षांसह अन्य परीक्षा सप्टेंबरनंतर आहेत.
-------------------
""क्लासेस, अभ्यासिका बंद करायला लावल्या आहेत. गरिब विद्यार्थ्यांनी स्टडी हॉलची सोय महत्वाची होती. त्यांची अडचण झाली आहे. राज्य सेवा पूर्व परीक्षा 5 एप्रिलला आहे. पोलिस उपनिरीक्षक, विक्री कर निरीक्षक, सहायक कक्ष अधिकारी पदाच्या परीक्षा सोबतच होणार आहेत. या काळात परीक्षेची तयारी महत्वाची होती. सारी मुले चिंतेत आहेत.''
- संजय सावळवाडे,
संचालक, कर्मवीर प्रबोधिनी, सांगली
""विद्यार्थ्यांचा अभ्यास मागे पडणार आहे. ऐन परीक्षेच्या काळात खंड पडणार आहे. जी मुले गावाहून आलीत, हॉस्टेलला राहिली आहेत, त्यांची अडचण झाली आहे. विद्यार्थ्यांची मानसिकता बदलणार आहे. ग्रंथालयही बंद झाली आहेत. त्यामुळे पुस्तकांची उपलब्धता अडचणीची ठरू शकते. हा विषय किती काळ चालेल, याची माहिती नाही. त्यामुळे गोंधळाची स्थिती आहे.''
- सोनाली ओतारी,
विद्यार्थीनी, सांगली
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.